हा खडक काही केल्या पाझरत नाही | |||||||||
मी याला पहाटे गोंजारले आहे, | |||||||||
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे, | |||||||||
रात्री माळरानावर नाचणार्या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे, | |||||||||
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही. | |||||||||
उन्हाळ्यात हा तापतो, | |||||||||
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार, | |||||||||
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून | |||||||||
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून | |||||||||
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो | |||||||||
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही. | |||||||||
आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो, | |||||||||
पण माझ्या सार्या गुराखी मित्रांबरोबर न रहाता | |||||||||
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो | |||||||||
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं. | |||||||||
मी माझी गाणी आवरून धरली आहेत; | |||||||||
मी आता पावाही वाजवत नाही; | |||||||||
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही; | |||||||||
या सार्यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे. | |||||||||
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही | |||||||||
हे ज्या क्षणी लक्षात आले | |||||||||
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे. | |||||||||
मी खडक असतो तर मलाही असं | |||||||||
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा, | |||||||||
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा | |||||||||
कोणी "मी" भेटेल ? | |||||||||
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत, | |||||||||
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक. | |||||||||
हा खडक काही केल्या पाझरत नाही. | |||||||||
हे सारे कित्येक दिवस चालू आहे. | |||||||||
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे | |||||||||
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक. | |||||||||
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे; | |||||||||
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत. | |||||||||
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना... | |||||||||
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे - | |||||||||
वारा, ऊन, थंडी, पाऊस; | |||||||||
भुलवत नाहीसे झाले आहे - | |||||||||
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस; | |||||||||
खडक झाल्यासारखे वाटत आहे. | |||||||||
----- |
|
My Thoughts..............My Collections................My Memories.................
Wednesday, 18 April 2012
खडक
Labels:
Marathi Collection
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment